विद्याभारती ही सन १९५२ पासून अखिल भारतीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना आहे. शिशुवाटिका, प्राथमिक व माध्यमिक विद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालये, एक शिक्षकी विद्यालये आणि संस्कार केंद्रे यांचाही समावेश होतो. भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित परंतु आधुनिकतेचा ध्यास असलेली शिक्षण व्यवस्था तसेच शिक्षणातील सुयोग्य नमुना देण्यासाठी ‘शिशुवाटिका, समग्र विकास व पंचकोषाधारित गुरुकुल’ असे प्रयोग विद्याभारती द्वारे यशस्वी होत आहेत.
केंद्र शासनाने घोषित केलेल्या व कार्यान्वित होणार्या राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधील अनेक बाबी विद्याभारती प्रारंभापासूनच यशस्वीरित्या राबवत आहे. शाळांच्या जोडीला प्रशिक्षण व संशोधन केंद्र, कौशल्य विकास केंद्र, क्रीडा केंद्र, वेदाध्ययन केंद्र, योग व संस्कृत केंद्र, पर्यावरणयुक्त व आयुर्वेदिक बाग, कृषी विकास, गोशाळा या सर्व गोष्टींनी युक्त असे महाराष्ट्रातील पहिले विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल ( प्रकल्प ) रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे आकारास येत आहे.